ज्ञानरचनावाद

ज्ञानरचनावाद
ज्ञानरचनावाद.... काय आहे आणि काय नाही?
गेल्या काही वर्षांत शिक्षणाच्या क्षेत्रात, विशेष करून प्राथमिक शिक्षणाच्या क्षेत्रात ज्ञानरचनावादाचा बराच बोलबाला आहे. रचनावाद, रचनावादी शिक्षणपद्धती असे शब्द वारंवार कानी पडतात. अनेकदा असे अनुभवास येते की या शब्दांचा अर्थ प्रत्येक जण आपल्याआपल्या सोयीने लावत असतो. शाळेत साधने वगैरे वापरून कृतियुक्त शिक्षण देणारे रचनावादाचे पुरस्कर्ते ‘आमच्या शाळेत आम्ही रचनावादी पद्धत वापरतो’ असे अभिमानाने म्हणताना दिसतात तर ‘रचनावाद येण्याआधी पासून आम्ही तुम्ही सांगता त्या गोष्टी करतच होतो, तुम्ही त्याला फक्त नाव दिलेत’ असे काहीजण म्हणताना दिसतात. काहीजण ‘वर्तनवाद’ विरुद्ध ‘रचनावाद’ अशी मांडणी करताना दिसतात. या मतमतांतरांमुळे बर्याच जणांचा गोंधळ होणे साहजिक आहे. त्यातून या विषयावर मराठीतून फारसे वाचायलाही मिळत नाही. म्हणून या लेखात रचनावादाची नेमकी संकल्पना काय आहे याची तोंडओळख करून देण्याचा प्रयत्न केला आहे. इथे एक बाब लक्षात घ्यायला हवी, ती म्हणजे, ही केवळ तोंडओळख आहे. या विषयाची व्याप्ती बरीच मोठी असल्याने अधिकचे वाचन करून, सहकार्यांशी चर्चा करून रचनावादाची पुरेशी सखोल समज बनवणे शिक्षक़ांसाठी अत्यावश्यक आहे.
रचनावाद हा मुलांच्या शिकण्याच्या प्रक्रियेवर प्रकाश टाकणारा एक सिद्धांत आहे. माणसाचे मूल कसे शिकते, या जुन्याच प्रश्नाचे नवे, अधिक विस्तृत उत्तर देण्याचा प्रयत्न रचनावादाने केला आहे. मात्र अजूनही या प्रश्नाचे परिपूर्ण उत्तर आपल्या हाती आले आहे असे नाही. मात्र नवनव्या संशोधनांतून या विषयीच्या आपल्या ज्ञानात नित्यनेमाने भर पडत आहे हे नक्की. मुलांच्या शिकण्याबाबत रचनावादाचे काय म्हणणे आहे हे पाहण्याआधी, आपण शिकण्याबाबतचे रचनावादाच्या आधीचे सिद्धांत काय होते हे पाहणे गरजेचे आहे.
कोरी पाटी सिद्धांत
‘मुलाचे मन म्हणजे कोरी पाटी त्यावर आपण हवे ते लिहू शकू’ (याचेच दुसरे रूप म्हणजे ‘मूल म्हणजे मातीचा गोळा’) असा सिद्धांत अनेक वर्षे रूढ होता. अजूनही त्याचे पडसाद कुठे क़ुठे ऐकायला मिळतातच. बाहेरच्या जगाचे प्रतिबिंब किंवा छाप मुलाच्या ‘रिकाम्या’ मनावर उमटणे म्हणजे मूल शिकणे अशी कल्पना अनेक दिवस सर्वमान्य होती. पण हळूहळू लक्षात आले की प्रत्येक मुलाला ‘आपल्याला हवे ते, हवे तसे, हवे तेव्हा’ शिकवता येईलच असे नाही. एकाच वातावरणात वाढणारी किंवा एकाच शिक्षकाकडून शिकणारी सगळीच मुले सारखी शिकत नाहीत. जर मुलांची मने म्हणजे कोर्या पाट्या असत्या तर मुलांच्या शिकण्यात असा फरक पडायचे कारण नाही !
वर्तनवादाचा सिद्धांत - स्वरूप आणि मर्यादा
मुलांच्या शिकण्याबाबतच्या अजून एका सिद्धांताचे अधिराज्य शिक्षणाच्या क्षेत्रात अनेक वर्षे राहिले. तो म्हणजे वर्तनवादाचा सिद्धांत. आजही शिक्षणशास्त्राच्या अभ्यासक्रमात हा सिद्धांत विस्ताराने अभ्यासला जातो. मानसशास्त्र म्हणजे मनाचा अभ्यास करणारे शास्त्र ही व्याख्या लोकांना भोंगळ वाटायला लागली कारण मनाच्या अस्तित्वाचा व स्वरूपाचा पुरावा देणे शक्य नव्हते. बारकाईने बघितले तर आपण एखाद्याच्या मनाबाबत जे आडाखे बांधतो ते त्याच्या वर्तनाच्या आधारे बांधतो. (उदाहरणार्थ, नितीनचे मन उदास आहे याचा आडाखा आपण ‘तो तोंड पाडून बसलाय’ ‘बोलत नाहीये’ असे त्याचे वर्तन पाहून बांधतो! कारण वर्तनाचे त्रयस्थपणे निरीक्षण करता येते.) त्यामुळे मग ‘वर्तनाचा अभ्यास करणे म्हणजे मानसशास्त्र’ अशी व्याख्या केली जाऊ लागली. या व्याख्येच्या शास्त्रीय असण्याचा दबदबा इतका होता की मानसिक अवस्था वा प्रक्रियांबद्दल बोलणे अशास्त्रीय गणले जाऊ लागले. वर्तनाचा अभ्यास करण्याच्या काळात प्राण्यांचे वर्तन अभ्यासण्याचे अनेक प्रयोग मानसशास्त्रज्ञांनी केले आणि प्राण्यांचे वर्तन आपल्याला हवे तसे बदलता येते हे सिद्ध करून दाखवले. वर्तनात बदल घडवण्याचे त्यांचे साधन होते बक्षिसे आणि शिक्षा ! एखादे वर्तन केल्यावर बक्षीस मिळाले तर प्राणी ते वर्तन पुन्हा पुन्हा करतो आणि शिक्षा मिळाली तर ते वर्तन करत नाही अशी ही ढोबळ व सहज दिसणारी मांडणी होती आणि म्हणून मग ‘मुलाच्या वर्तनात शिक्षकाला अपेक्षित बदल घडणे म्हणजे शिकणे’ अशी आपल्याला सुपरिचित असलेली शिकण्याची व्याख्या अस्तित्वात आली. वर्तनातील हा बदल कायमस्वरूपी टिकावा यासाठी पुन्हा पुन्हा सराव करणे गरजेचे आहे हेही लक्षात आले. प्राणिल स्वरूपाच्या गोष्टी मूल कसे शिकते हे सांगण्यात वर्तनवाद कमालीचा यशस्वी झाला. मात्र माणसाच्या मुलाचे शिकणे प्राण्यांपेक्षा कमालीचे गुंतागुंतीचे असते. त्याचे समग्र स्पष्टीकरण वर्तनावादाच्या आधारे करणे कठीण होऊ लागले.
मूल मातृभाषा (खरे तर परिसर भाषा म्हणायला हवे !) कशी शिकते हे सांगताना वर्तनवादी सिद्धांत अगदीच तोकडा पडू लागला.

No comments: