पोरा, जमलंच तर गावात येवून बघ...
हायफाय गाडीतून येताना बायकोपोरांना सोबत आण, येता येता रानात जावून ये, सुकलेली पिकं बघ, मातीत गेलेला खर्च बघ, गोठ्यात चाऱ्याविना टाचा घासणारी गायीम्हसरं बघ, बांधावर आभाळाकडं डोळ लावून बसलेली भावकीतली माणसं बघ, पण कोणाशी काही बोलू नको, तत्वज्ञानाच्या गप्पा, दुप्पट उत्पन्नाचे सल्ले तर देवूच नको, लोक तुझ्याआईचा उध्दार करतील.
गुदस्ता तू मागितलेल्या शेतीचा हिशोब तुला नी तुझ्या बायकोला द्यायचाय. आयुष्यभर सुपारीच खांडही खानं झालं नाही की पायाला पायतान आणलं नाही. फक्त एकच व्यसन होतं जुगाराचं. होय तोच जुगार, शेतीचा. पेरललं उगवलं नाही, उगवलेलं खळ्यात आलं नाही अन् आलं तर भाव मिळाला नाही. दरवर्षीच्या हिशोबात उने जातोय, दरवर्षी कर्जाचा डोंगर होतोय. एक दिवस याच डोंगरात गडप होईल, कायमचा.
पावसाने दगा दिलाय तुझ्या बापाच्या इश्वासाला. पेरलेलं सुकून गेलय, वावटळी उठू लागल्यात नी पिकं मुळासकट उलटून चाललीयत. उन्हाळ्यागत हंडाभर पाण्यासाठी तूझी माय नव परसाच्या हिरीत उतरतीय. कवतीक नाही रं याच, दुख:य गड्या. तु बारिक व्हतास तव्हा वाटलं व्हतं, सायब झाला तर हिरीतून पाणी काढायचं चुकल पण ते स्वप्नच राहिलंय अजून तरी. असो, चार दिसाखाली, बायजा काकूचा हिरीत तोल गेला नी ती जिवंत परतली नाही. मला तुझ्या मायीचीही भीती वाटते. कुशा पाटील वावराला चकरा मारून बेजार झालाय. रोज वगाराचं दावं हातात घेतो, मारोतीच्या पाराला येढा हानतो अन् हात जोडत शेवटाचा आलोय असे सांगतो पण लेकीच लगीन राहिलंय म्हणून तो मागे फिरतो. गुदास्ता लेकीच लगीन झालं असतं तर आज त्याच्या बापाच्या थडग्याला चिटकून ह्याच्याही थडग्याला निवद दाखवायची येळ आली असती.
तुझी शिकली सवरलेली बायको दरवर्षी येवून शेतीचा हिशोब मागते, तेव्हा जिंदगीचाच हिशोब चुकलाय अस वाटून जातं. कधीतरी पाप केलेलं फेडतोय अस बारमाही वाटतं. "थेरडे काहीच कामाचे नाहीत" असं जव्हा ती म्हणते तव्हा तर विशाची बाटली घ्यावी नी संपूस्तर खाली टाकू नये, असच वाटतं. पन तुला आडचण आली तर कोण सोडविल म्हणून तीचं विशारी बोलनं गिळून घेतो, गोड समजून. आदली पायलीनं घरात आलेल्या धान्याचा हिशोब तरी देणार कसा, तूच सांग. तरी दोन वेळचा विचार न करता तुला दरवर्षी चार पोते टेम्पोत पाठवून देतोय मायेच्या ममतेन. पिकलं नाही तरी इकत घेवून पाठवलं, त्याची काळजी करू नको, फक्त गावात लै मजाय, गावाशिवाय जिंदगी नाही, असं शहरात बसून कोणाला सांगू नको, इतकीच हात जोडून इनंती.
- तुझाच बाप
#शेतकरी
-----
No comments:
Post a Comment